Tuesday, June 1, 2010

अनास्था झटका , कृती करा.

थोर विचारवंत आणि एक निःस्वार्थ समाजसेवक प्रा.ग.प्र. प्रधान यांचे नुकतेच निधन होऊन त्यांचे मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानही झाले. त्यांचे अनुयायी, चाहते आणि शिष्यही फारच मोठ्या प्रमाणात असून त्या सर्वांनाच कळकळीची विनंती करावीशी वाटते की त्यांनी निदान नेत्रदानाचा तरी ठाम संकल्प करावा आणि तो नातलगांच्याही मनावर पूर्णपणे बिम्बवावा. हे आवर्जून सांगण्याचा उद्देश एवढाच की बरेचदा आपली अशी इच्छा आपल्याबरोबरच हवेत विरून जाण्याची शक्यता अधिक असते.
भारतातील सुमारे सव्वा कोटी नेत्रहीनापैकी सुमारे तीस लाखांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकते. यासाठी लाख -दीड लाख नेत्रदाने होणे अत्यावश्यक असताना या महान देशात फक्त सुमारे १५ हजार व्यक्तींचीच होतात, निधन पावणारे आहेत तब्बल ८५ लाख !
या महान देशात आपण जेवढे नेत्र नेत्ररोपणासाठी निर्माण करतो,जवळजवळ तेवढेच नेत्र श्री लंकेसारखा छोटा देश आपल्याला (तसेच इतर सुमारे २५ देशांनाही ) नियमितपणे पुरवतो. हे असले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन कुठल्याही सच्च्या भारतीयाला शरमेने मान खाली घालायला लावणारेच नाही काय? गरज आहे ती रोमरोमात भिनलेली भयानक अनास्था झटकून यथार्थ जाणीवेने कृति करण्याची.